टेंभुर्णी – आर्या पब्लिक स्कूल, सरस्वती विद्यामंदिर पिंपळनेर आणि आर्या ज्युनिअर कॉलेज पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि विज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता यावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये तब्बल १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ३५० वैज्ञानिक उपकरणे व प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध वैज्ञानिक संकल्पना प्रभावीपणे मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनाचे उद्घाटन सीबीएसई रिजनल ऑफिस पुणे येथील सेक्शन ऑफिसर पल्लवी माळी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पल्लवी माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विज्ञानाचा दृष्टिकोन केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन जीवनात उपयोगात आणला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशील वृत्ती जोपासून भविष्यात संशोधनाच्या क्षेत्रात पुढे यावे,” असे आवाहन केले.
या उपक्रमाचे आयोजन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेची निर्मिती, प्लास्टिकमुक्तीचा संदेश, स्मार्ट शेती, वैज्ञानिक रांगोळी, पर्यावरण संरक्षण, पाणी बचत यांसारखे समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीची झलक पाहायला मिळाली.
या प्रसंगी प्राचार्य रवींद्र लोखंडे, प्राचार्य महादेव सुरवसे, प्राचार्य सागर थोरात, प्राचार्य डॉ. नितीन उबाळे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र मारकड, मुख्याध्यापिका प्रमिला मगर, अश्विनी गरड, सतिश वरपे, कुमार बडे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळाली असून, या उपक्रमातून विज्ञानाबद्दलची आवड अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

























