सोलापूर : सारथी यूथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला आर्थिक बळ मिळावे आणि सोलापुरातील स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘शिवबा ते छत्रपती’ या महानाट्य प्रयोगाचे बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सारथी यूथ फाउंडेशन गेल्या पंधरा वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि वस्त्यांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शने, प्रत्यक्ष समुपदेशन, हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन, मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे, बेरोजगारांसाठी निर्व्यसनी वाहनचालक प्रशिक्षण तसेच टी.ए. बैठका आदी उपक्रम राबविले जातात. आतापर्यंत हजारो नागरिकांना व्यसनापासून परावृत्त करण्यात संस्थेला यश आले असून अनेक कुटुंबांचे जीवन पुन्हा सुरळीत झाले आहे.
व्यसनमुक्तीबरोबरच संस्थेकडून गरजू नागरिकांना कपडे वाटप, वंचितांसाठी दिवाळी फराळ वाटप, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम, कामगार कुटुंबातील मुलांसाठी संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक मदत तसेच गरजूंना सायकलींचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या सामाजिक कार्याला आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने सोलापूरमधील स्थानिक कलाकारांच्या सहभागातून ‘शिवबा ते छत्रपती’ हा महानाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग या महानाट्यातून रसिकांना अनुभवता येणार आहेत.
या प्रयोगासाठी देणगी प्रवेशिका असून सोलापूर शहरासह परिसरातील शिवप्रेमी व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन फाउंडेशनचे सचिव वाघमारे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष ॲड. जावेद नगारे, कोअर कमिटीचे सदस्य प्रसाद अतनूरकर, बजरंग होटकर, गुरुनाथ ताटे आणि शहाजी ढोले, योगेश हसरभावे आदी उपस्थित होते.
—-
Post Views: 6