सोलापूर : महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचे तैलचित्र लावण्यास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच तैलचित्र लावण्याची घोषणा केली. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या महाराष्ट्र शाखेने मुंबईतील मेळाव्यात केलेल्या विविध मागण्यांवर नार्वेकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली. लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात हा मेळावा झाला. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या सत्कारासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.प्रास्ताविकात चाकोते यांनी वीरशैव लिंगायत समाजाला ‘सकल वीरशैव समाज’ असे संबोधावे, विधानसभेत महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र लावावे, नवी मुंबईत समाजासाठी एक एकर जागा द्यावी, महाराष्ट्र मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, तसेच वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म व अल्पसंख्याक दर्जा द्यावा, अशा मागण्या मांडल्या.
२०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अल्पसंख्याक दर्जासाठी प्रयत्न केले होते; मात्र केंद्रातील सत्तांतरानंतर ही मागणी प्रलंबित राहिल्याचे चाकोते यांनी सांगितले. यावेळी नार्वेकरांनी तैलचित्राबाबत सकारात्मक निर्णय जाहीर केला.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे, अरविंद जत्ती, जगदीश शेट्टर, अशोक केनी, ह.भ.प. गहणीनाथ औसेकर महाराज, डॉ. दाक्षायणी अव्वाजी आणि मंगेश चिवटे यांच्यासह विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मेळाव्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांतील वीरशैव समाजाचे पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेस माजी महापौर शोभा बनशेट्टी,
श्रीशैल बनशेट्टी आदी उपस्थित होते.
Post Views: 7