अक्कलकोट – दुष्काळाची तीव्रता वाढत असताना माणसांसोबतच पशुपक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हीच जाणीव मनात ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,काजीकणबस येथील गुरुजी व विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांसाठी पानवठ्याची सोय करून माणुसकीचा अनोखा संदेश दिला.
शाळेच्या आवारातील झाडांवर विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत.बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या,सुतळी,मातीची भांडी,डाबण आदी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून विद्यार्थ्यांनी हे पाणवठे साकारले.त्यामुळे शाळेच्या परिसरातील झाडे आता पक्ष्यांसाठी पाण्याचे हक्काचे ठिकाण बनली आहेत.
दुष्काळात पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच पशुपक्ष्यांविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करत ‘पाणी वाचवा,जीव वाचवा’ हा संदेशही दिला.
या उपक्रमावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ खुबा,मुख्याध्यापक गिरीधर चव्हाण,पोलीस पाटील दीपक मंठाळे,अजित खरात,आकाश घुगे,शरणय्या स्वामी,सोमनाथ मोरे,शंभुलिंग अकतनाळ आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या माणुसकीच्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी,किणी केंद्राचे केंद्रप्रमुख शिवशंकर मिटगारे व पालकांनी कौतुक केले.