अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासासाठीच्या आराखड्यास अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अनुसरून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मान्यता देत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अक्कलकोटच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून धार्मिक, पर्यटन आणि नागरी विकासाला नवे बळ मिळणार आहे.
या प्रस्तावासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी संयुक्तपणे शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला. शासनाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याने मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळांची उभारणी, आरक्षित जागांचा विकास, पादचारी सुविधांची निर्मिती तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी म्हाडाने आवश्यक निधीची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे.
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या संपूर्ण पायाभूत विकासासाठी म्हाडाने मंदिराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्याची महाराष्ट्रात प्रथमच महत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे. म्हाडाच्या या संकल्पनेतून अक्कलकोटचा विकास दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसराचा विकास करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ या पालखी मार्गाचा विकास साधला जाणार आहे. या दोन्ही कामांमुळे अक्कलकोट शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसणार आहे.
विशेष नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील विद्यमान नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येतील. त्यानंतर मंदिर परिसराच्या नियोजन, विकास आणि अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्यात येणार आहे.
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या अक्कलकोटचा नियोजनबद्ध, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याच्या दिशेने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
चौकट :
श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा विकास, पालखी मार्गाचे सुशोभीकरण, समाधी मंदिर परिसराचा विकास, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण, तलाव व उद्यानांचे संवर्धन तसेच भाविकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा उभारण्याचाही आराखड्यात समावेश आहे.
प्रतिक्रिया :
देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून, तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांचे सहकार्य लाभल्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करीत आहे.
– सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट
Post Views: 7