सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोलापूर चेस अकॅडमी तसेच चॅम्प चेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
मुलांच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मानस गायकवाड, श्रेयस कुदळे, आदिराज म्हेत्रे, ओम राऊत, आयुष जानगवळी, श्रेयांश इंगळे, मयूर स्वामी, हिमांशू व्हनगावाडे, सार्थक राऊत, श्लोक चौधरी, देवदत्त पटवर्धन, नैतिक होटकर, युवराज गायकवाड, नागेश राजमाने, कृष्णराज पताले व सानिध्य जमादार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शानदार विजय मिळविला.
मुलींच्या गटात बार्शीची राष्ट्रीय खेळाडू सानवी गोरे, सृष्टी गायकवाड, अनन्या उलभगत तसेच आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त स्वराली हातवळणे, मनस्वी क्षिरसागर व संस्कृती जाधव यांनी आकर्षक खेळाचे प्रदर्शन करत विजयी सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी प्रशाला व ज्युनिअर आणि सिनियर नाईट कॉलेज येथील राजर्षी शाहू सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेत १०१ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चार मुले व चार मुलींची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत असून उपस्थितांना अनेक प्रेक्षणीय लढती पाहण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे सात वर्षीय उदयोन्मुख खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर मनोहरपंत सपाटे यांनी पटावरील अश्वाची चाल करत केले. यावेळी स्पर्धेचे संयोजक विद्यापीठ सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. नागेश गायकवाड, प्रा. संतोष गवळी, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय खेळाडू दीक्षा कुलकर्णी हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील, प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड तर आभार प्रा. संतोष गवळी यांनी मानले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा–राठी, प्रशांत पिसे, पद्मजा घोडके आदी काम पाहत आहेत.























