सोलापूर – पार्क मैदान येथे झालेल्या अभिसिद्ध पेरेंट्स लीगच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात अभिसिद्ध संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अभिसिद्ध विरुद्ध टाइम्स यांच्यात झालेल्या या सामन्यात अभिसिद्ध संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ९ बाद १०९ धावा उभारल्या. यामध्ये कुणाल झवर याने ३२ धावांचे तर अतुल परदेशी याने १६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. टाइम्स संघाकडून अयुब पट्टेवाले, प्रविण यादव (३ बळी) आणि आनंद खमीतकर (२ बळी) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
विजयासाठी ११० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टाइम्स संघाला अभिसिद्धच्या अचूक गोलंदाजीसमोर १५ षटकांत ७ बाद ९६ धावांपर्यंतच मजल मारता आली. टाइम्सकडून प्रविण यादव याने २१ आणि प्रतीक बाकळे याने १५ धावा केल्या, मात्र अजय माळी आणि अतुल परदेशी (२ बळी) यांच्या भेदक माऱ्यामुळे अभिसिद्ध संघाने १३ धावांनी विजय मिळवला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास जयंत प्रजापती, नंदकुमार टेळे, श्री. मेहता , आजीवन वाटर्सचे सिईओ डॉ. अनुज घोरपडे, सूर्यकांत खंडेलवाल, सोहेल मुन्शी, अतिक शेख, मकरंद बसवंती, नीरज वेलानी, काका सुरवसे आणि चिराग वेलानी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्या अभिसिद्ध संघाला २१ हजार रुपये व ट्रॉफी, तर उपविजेत्या टाइम्स संघाला १५ हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक कामगिरीमध्ये प्रविण यादव याने ‘मालिकावीर’चा बहुमान पटकावला, तर काशिनाथ कोळी ‘बेस्ट बॅट्समन’ आणि अयुब पट्टेवाले ‘बेस्ट बॉलर’ ठरले. अंतिम सामन्यात चमकलेल्या कुणाल झवर याला ‘सामनावीर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवीन माने, अजय माळी, अतुल परदेशी, सुरज शाह आणि प्रसाद शावांतुल यांनी परिश्रम घेतले.






















