सोलापूर – शालेय शहर १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात अतिशय चुरशीने झालेल्या स्पर्धेत आठव्या फेरीअखेर पाच खेळाडूंनी प्रत्येकी सात गुण मिळविल्यामुळे टायब्रेकमध्ये सरस बुचोल्स गुणपद्धतीवर इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डचा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त साईराज घोडकेने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात यशोधरा क. महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे हिने उत्कृष्ट खेळत सात पैकी सात गुण मिळवीत बाजी मारली.
पार्क स्टेडीयम येथील जिमखाना हॉल येथे संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत हर्ष हलमल्ली (के.एल.ई) आरुष कंदले (शांती इंग्लिश मीडियम स्कूल), श्रीवीर जिल्ला (डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल), साईराज चीप्पा (श्री. सिद्धेश्वर प्रशाला) यांनी तसेच मुलींच्या गटात फराह शेख (नवजीवन स्कूल), स्वरा कस्तुरे (श्री. दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला), वेदांकिता पाटील (एस. आर. चंडक हायस्कूल) यांनी प्रत्येकी सहा गुणांसह व के.एल.ई च्या कार्तिकी गायकवाड हिने साडेपाच गुणांसह अनुक्रमे द्वितीय, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवत आपले संघातील स्थान निश्चित केले.
स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंची निवड पुणे येथे दिनांक ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झालेली आहे. यावेळी मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, प्रथमेश हिरापुरे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, क्रीडा शिक्षक सुभाष उपासे, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, युवराज पोगुल, आकाश चव्हाण, रिद्धी उपासे, नवीना वडीशेरला आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Post Views: 4