सोलापूर – प्राथमिक शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा बोजा, ऑनलाइन कामांचा अतिरिक्त ताण आणि शाळांच्या दैनंदिन व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्नांचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याने जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी आता प्रशासनाकडे प्रश्नांच्या तातडीच्या निवारणासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. सोलापूर जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी अशैक्षणिक कामे तसेच शैक्षणिक गुणवत्तेला बाधा आणणारी अनावश्यक ऑनलाइन कामे कमी करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी प्रमुख मागणी संघटनांनी केली. शिक्षकांचा वेळ प्रशासकीय कामांपेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वापरला जावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, प्रधानमंत्री पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना धान्य व आवश्यक साहित्याचा पुरवठा वेळेत होत नसल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला. संबंधित साहित्याचा तातडीने पुरवठा करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेश योजनेचे प्रलंबित अनुदानही तातडीने अदा करावे, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसह जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष कार्यशाळा घेण्याची सूचना करण्यात आली. व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतील विजेत्यांना अद्याप पारितोषिके मिळाली नसल्याने त्यांचे तातडीने वितरण करावे, अशी मागणीही करण्यात आली.
सन २०२४-२५ मधील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची यादी त्वरित जाहीर करावी, तसेच दोन्ही वर्षांचा पुरस्कार सोहळा संयुक्तपणे आयोजित करावा, अशी मागणी संघटनांनी केली. तालुकास्तरीय पुरस्कार सोहळ्यांबाबतही स्पष्ट सूचना देण्याची विनंती करण्यात आली.
शिक्षकांच्या प्रशासकीय अडचणी दूर झाल्यास त्याचा थेट फायदा अध्यापन प्रक्रियेला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला होऊ शकतो. त्यामुळे निवेदनातील मागण्यांवर प्रशासनाने कालबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली. यावेळी अनिरुद्ध पवार, वीरभद्र यादवाड, संजीव चाफाकरंडे, अमोघसिद्ध कोळी, हजरत शेख, सुरेश पवार, राजन सावंत, झुल्फिकार मुजावर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.