बार्शी – बार्शी येथील श्री भगवंत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारुड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या स्पर्धेत रुपालीताई देशपांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपली कलाकारी सिद्ध केली. तर गणेश महाराज पाटोळे यांनी द्वितीय आणि जगन्नाथ महाराज खरात यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
श्री भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने बार्शीतील यशवंतराव सांस्कृतिक सभागृहात दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४० संघांनी सहभाग नोंदवला होता. भारुड या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक विषयांचे प्रभावी सादरीकरण करत स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आणि संगीत विशारद निलेश मांजरे यांनी काम पाहिले. त्यांच्या कसून परीक्षणानंतर विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
प्रथम क्रमांक मिळवलेल्या रुपालीताई देशपांडे यांना रोख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांकाच्या गणेश महाराज पाटोळे यांना ३१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या जगन्नाथ महाराज खरात यांना २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ सरिताताई जोशी आणि संतोष महाराज भालेराव यांना प्रत्येकी ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार तथा महोत्सवाचे संकल्पक राजेंद्र राऊत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. भगवंत मैदान येथील मुख्य रंगमंचावर पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच महोत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भारुड स्पर्धेमुळे श्री भगवंत महोत्सवाची सुरुवात अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक रंगतदार वातावरणात झाली. पारंपरिक भारुड कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देत या स्पर्धेने महोत्सवाला एक अर्थपूर्ण दिशा दिली.





















