सांगोला – महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणामुळे टेंभू-म्हैसाळ धरणे आज पूर्ण क्षमतेने भरली असून, आता या योजनेचे पाणी माण नदीवरील सर्व बंधाऱ्यांमध्ये सोडून दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. यासाठी माण नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींनी तातडीने ठराव मंजूर करून संबंधित जलसंपदा विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे टेंभू-म्हैसाळ योजनेतून माण नदीत पाणी सोडण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच पाणी प्रवाहित होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाला गती देण्यासाठी माण नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींनी ठराव तातडीने मंजूर करून संबंधित विभागाकडे सादर करावा. जनहिताच्या या कामात प्रत्येक ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले आहे.
चौकट-
महायुती सरकारने दिलेला शब्द हा केवळ आश्वासन नसून कृतीतून सिद्ध होणारा विश्वास आहे. माण नदीतील बंधारे भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला संजीवनी मिळेल, भूजल पातळीत वाढ होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि संपूर्ण परिसराला मोठा दिलासा मिळेल.
-चेतनसिंह केदार-सावंत, सभापती,
सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य समिती
Post Views: 23