सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल गेल्या ८ मे रोजी जाहीर झाला होता. या निकालानंतर सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत मूळ गुणपत्रकाची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली.
मंडळाच्या अधिकृत कार्यपद्धतीनुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार, १ जून रोजी सकाळी ११.०० वाजता गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख सुपूर्द केले जातील. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या नियोजनाखाली त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता सर्व शाळांमार्फत विद्यार्थ्यांना हे गुणपत्रक थेट हाती दिले जाईल.
पुढील अकरावी प्रवेश आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही मूळ कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे संबंधित सर्व मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी या वेळेची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि विहित वेळेत शाळेत उपस्थित राहून आपली गुणपत्रके प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन विभागीय मंडळाने केले आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना आधीच सूचित करण्यात आले असून शाळा स्तरावर वाटपाची तयारी पूर्ण झाली आहे.
Post Views: 5