श्रीपूर – श्रीपूर, ता. माळशिरस : श्रीपूर परिसरातील ढेरेवस्ती–संजयनगर भागात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतातील विहिरी व बोअरमधील पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन विद्युत मोटारी चोरून नेल्याची घटना घडली असून एकाच रात्री तीन शेतकऱ्यांच्या शेतीपंप चोरट्यांनी पपळविल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथिल विठ्ठल चंद्रू चव्हाण, तानाजी किसन चव्हाण आणि भारत सनकादिक ढेरे यांच्या शेतात ही चोरी झाली आहे .
शेतातील मोटार चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मोटारीसोबत पाइप, केबल असे मिळून सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर या चोरीमुळे अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.
श्रीपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीसाठी पाण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली शेतीपंपाची मोटारच चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा नवीन मोटार व साहित्य खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता शेती साहित्य चोरीच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे.
अकलूज पोलीस ठाणे आणि श्रीपूर आऊट पोस्टच्या हद्दीतील ग्रामीण भागात शेतातील केबल, विद्युत मोटारी व शेतीसाठी लागणारे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याची तक्रार स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तसेच ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या माळा चोरीला जाण्याच्या घटनांमुळेही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये शेतकरी नसल्याचा गैरफायदा घेत चोरटे शेतीपंप, केबल व इतर साहित्य चोरत असल्याने शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चोरीला गेलेल्या मोटारींचा शोध घ्यावा, चोरट्यांचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच श्रीपूर व परिसरातील ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचा आधार असलेल्या विद्युत मोटारींची चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Post Views: 6