पंढरपूर – विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून शाळाकृती समितीचे राज्य सचिव दत्तात्रय सावंत यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर नारळ फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्राची पायाभरणी बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशाने आपण निवडणूक लढवत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. जुनी पेन्शन योजना हा जिव्हाळ्याचा विषय असून १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहे. शासनाने १८ लाख कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला असला, तरी त्यांची कपात थांबवून जीपीएफ व्याजासह परत मिळावा आणि २००६ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी आपला संघर्ष सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यासोबतच विनावेतन व टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे प्रश्न, पेन्शनपासून वंचित कर्मचारी आणि २०१२ पासूनच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील प्रतिपूर्तीच्या प्रश्नांवर त्यांनी भर दिला. विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी माझ्यासाठी मतदान मागणार नाही, तर शिक्षकांनी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर विचार करून शिक्षकालाच मतदान करावे, असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.
——————–
चौकट : ( दत्तात्रय सावंत यांचे प्रचारातील प्रमुख मुद्दे )
जुनी पेन्शन योजनेसाठी संघर्ष. विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान. शिक्षकांना योग्य मोबदला आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण. ‘शिक्षक हाच आपला पक्ष’ या भूमिकेवर उमेदवार दत्तात्रय सावंत ठाम आहेत. या बरोबरच आजपर्यंत शिक्षकांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा देखील ते प्रचारा मधून मांडून आपण उमेदवार म्हणून कसे योग्य आहोत याचा उहापोह देखील करणार…
Post Views: 8