सोलापूर – येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या तीन खेळाडूंची ‘अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धे’साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवड यादीनुसारसुमेध चंदने (७४ किलो वजन गट), साक्षी पवार (८४ किलो) व वैष्णवी माने (८४ किलोवरील) या तिन्ही खेळाडूंनी विद्यापीठाच्या आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, ‘ऑल इंडिया युनिव्हर्सिटी’ (AIU) ने प्रत्येक वजन गटासाठी निश्चित केलेले किमान वजन उचलण्याचे कठीण पात्रता निकष यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे त्यांची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या वर्षीच्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन चेन्नई (मद्रास) येथील ‘हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’ तर्फे करण्यात आले आहे.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष गवळी, प्रा. सचिन गायकवाड, नवनाथ गायकर आणि गिरीश गिंडी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे, जनरल सेक्रेटरी महेश माने आणि प्राचार्य डॉ. नितीन मोटे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून पुढील राष्ट्रीय स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
























