
सोलापूर : कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी अनीश कोटी, अर्नव पाटील आणि आदित्य निशार यांनी विकसित केलेल्या “डिझाइन सिस्टीम ऑफ आयओटी ड्रिव्हन बेस्ड क्रॉप रेकमेंडेशन सिस्टीम यूजिंग मशीन लर्निंग फॉर स्मार्ट ॲग्रिकल्चर” या संशोधनाचा भारतीय पेटंट नुकताच प्रकाशित झाला आहे.
ही प्रणाली इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि मशीन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना योग्य पीक निवडीसाठी वैज्ञानिक मार्गदर्शन करते. शेतात बसविण्यात आलेले सेन्सर्स जमिनीतील आर्द्रता, तापमान, हवेतील आर्द्रता आणि इतर कृषी घटकांचा डेटा संकलित करतात. या माहितीचे मशीन लर्निंग अल्गोरिदमद्वारे विश्लेषण करून त्या भागासाठी सर्वाधिक उपयुक्त आणि उत्पादनक्षम पिकाची शिफारस केली जाते.
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अनुभवाधारित अंदाजांऐवजी वैज्ञानिक माहितीच्या आधारे निर्णय घेता येणार असून उत्पादनवाढ, खर्चात बचत, पाणी व खतांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी हे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले जाते. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संशोधनासाठी पोषक वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवसंशोधनाचे रूप मिळत आहे.
या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, वैभव गांधी, पराग शहा, प्र. प्राचार्य डॉ. सचिन गेंगजे, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. श्रीशैलप्पा पाटील, विभागप्रमुख डॉ. अनिता पूजार तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.























