सोलापूर : मकर संक्रांत व सिद्धेश्वर यात्रेचे औचित्य साधून अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला पालकांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिला पालक व शिक्षिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी सामाजिक व सांस्कृतिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित महिला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून परंपरेचे जतन व संवर्धन केले. प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी इस्माईल उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका माहेजबीन शेख यांच्या हस्ते उपस्थित महिला पालकांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. महिलांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना दीक्षित यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन कल्पना जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शाळा व पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होत असून, महिला सक्षमीकरण व सामाजिक एकात्मतेला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
फोटो : हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित महिला पालक व शिक्षिका.


















