बार्शी – मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १७ जून रोजी पहाटे बार्शी-लातूर मार्गावरील कुसळंब परिसरात घडली. या अपघातामुळे कुसळंब गावावर शोककळा पसरली असून संबंधित कार चालकाविरुद्ध बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय राजेंद्र शिंदे (वय ३१, रा. कुसळंब, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे वडील राजेंद्र एकनाथ शिंदे (वय ५९) आणि त्यांचे मित्र सोपान रामलिंग गादेकर (वय ७०) हे दोघे नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी कुसळंब ते पांगरी रस्त्याने पायी गेले होते.
पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान या दोघांचा अपघात झाल्याची माहिती गावात पसरताच विजय शिंदे यांच्यासह गावातील काही नागरिक घटनास्थळी पोहोचले. बार्शी-लातूर महामार्गावर प्रदीप विठ्ठल काशीद यांच्या शेतालगत रस्त्याच्या कडेला राजेंद्र शिंदे आणि सोपान गादेकर हे गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. काही अंतरावर अपघातग्रस्त लाल रंगाची एमएच-१४ एचडी-२२३९ क्रमांकाची कार उभी असल्याचेही निदर्शनास आले.
जखमींना तातडीने उपचारासाठी बार्शी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.
फिर्यादीनुसार, कार चालक इरफान चंदुलाल तांबोळी (रा. पिंपरी आंबा, जि. लातूर) याने आपल्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. मॉर्निंग वॉकसाठी पायी चालत असलेल्या राजेंद्र शिंदे व सोपान गादेकर यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारचेही सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 20