सोलापूर- जैन कासार समाज संस्थेच्या वतीने जैन कासार समाजाचे आठवे अधिवेशन नुकतेच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथे उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे म्हणाले, आजच्या वेगवान युगात समाजाला, विशेषतः आपल्या युवा पिढीला योग्य विचारांची आणि प्रबोधनाची नितांत गरज आहे. केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही, तर माणूस म्हणून घडण्यासाठी मूल्यांची आणि संस्कारांची जोड आवश्यक असते. जेव्हा विचारांना प्रबोधनाची दिशा मिळते, तेव्हाच एक सुसंस्कृत आणि संस्कारक्षम समाज निर्माण होतो, यासाठी संस्थेने युवक-यु्वतींचे मेळावे घेऊन प्रबोधन करावे, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रकाश मांगले होते.
आचार्य समयसागर महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने तसेच प.पू. अक्षयसागर महाराज व उपशमसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. कष्टाळू, प्रामाणिक व सदाचारी जीवनमूल्यांची जपणूक करणाऱ्या जैन कासार समाजाच्या उत्कर्षासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले (सांगली) यांनी सांगितले.
कार्यक्रमास बा. ब्र. तात्या भैय्या (नेजकर), मिलिंद यंबल, हिंगोली, डॉ. प्रदीप वानरे, पुसद, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, लातूर, जी.एस.टी. अधिकारी चेतन बांडे, निलेश उखळकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले, प्रमुख संघटक प्रा. सुभाष दगडे, कार्याध्यक्ष महावीर दुरुगकर, सचिव अजित मोहिरे आदी उपस्थित होते.
दिवाळी अंकाचे झाले प्रकाशन
समाजातील अमृतमहोत्सवी ज्येष्ठ बांधवांचा गौरव, ज्ञानवंत व गुणवंत समाज बांधवांचा सन्मान तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शिष्यवृत्तीचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच, यावेळी ‘जैन कासार समाचार’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी येथील अजित मोहिरे यांनी ‘आपल्या हक्काच्या शासकीय योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले.
अधिवेशनासाठी मराठवाडा विभागप्रमुख विलास वानरे, विदर्भ विभागप्रमुख अभयकुमार गुंगे, हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रशांत कंधारकर, मंगेश विभुते, सागर मरळे, विदर्भ महिला आघाडी प्रमुख. शुभांगी जैन-मरळे यांच्यासह मराठवाडा व विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुभाष दगडे, अनंतकुमार विश्वभर, तर आभार प्रशांत कंधारकर यांनी मानले.
Views: 94