अक्कलकोट : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपा प्रणित सहकार विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने आता चेअरमन पदाच्या निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे याकरिता अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची चेअरमन पदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे. अक्कलकोट तालुका वासीयानां सोलापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाचे वेथ लागले असुन याची उत्सुकता गिगेला पोहचली आहे .
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोसायटी मतदारसंघातून डीसीसी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांनी आपले राजकीय संबंध आणि जनसंपर्क वाढवला आहे. ज्येष्ठ नेत्यांशी समन्वय साधत राजकारण करण्याची त्यांची पद्धत त्यांच्या जमेची बाजू मानली जाते. भारतीय जनता पार्टीमध्ये युवा आणि प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले त्यांचे निकटचे राजकीय संबंध आणि पक्ष संघटनेतील वाढती जबाबदारी यामुळे डीसीसी बँकेच्या चेअरमनपदासाठी त्यांच्या नावाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे.
डीसीसी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या बँकेच्या चेअरमनपदाला राजकीय आणि सहकार क्षेत्रात विशेष महत्त्व आहे. या पदावर कोण विराजमान होणार, यावर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आगामी राजकीय समीकरणांची दिशाही अवलंबून राहणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना चेअरमनपदाची संधी मिळाल्यास अक्कलकोट तालुक्याच्या राजकीय प्रतिष्ठेत भर पडेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अक्कलकोटचा प्रभाव वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या प्रश्नांवर त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळू शकते. मात्र, सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय वर्तुळातील अंदाज आणि शक्यतांवर आधारित आहेत. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि निवडून आलेले संचालक यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल.
भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एक हाती वर्चस्व मिळविले आहे. आता चेअरमनपदासाठी कोणाला संधी द्यायची, हा पक्षासमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका या निवडीत निर्णायक ठरणार का, याबाबतही उत्सुकता आहे. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाला पसंती मिळणार की अन्य कोणाला संधी मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे बँकेच्या निवडणुकीतील विजयाचे गणित, तर दुसरीकडे चेअरमनपदाची राजकीय रस्सीखेच, अशा दुहेरी चर्चांनी सोलापूरचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता डीसीसी बँकेच्या चेअरमनपदाच्या निर्णयाकडे लागले आहे. अखेर कोणाच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडणार याकडे अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Views: 4