बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी येथे आज दि. १४ जुलै रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी लोंढे यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सर्वप्रथम मांडला. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे श्री अमोल ताकभाते, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन समाज शिक्षण उपसंचालक धाराशिव यांचा परिचय प्रा.विजय जगदाळे यांनी करुन दिला. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर हे होते.

या कार्यक्रमात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपली ओळख सर्वांना करुन दिली. तसेच त्यांचे स्वागत देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संस्थेविषयीची माहिती प्रा. डॉ. उलभगत सर यांनी करुन दिली तर वर्गशिक्षक म्हणून असणारे शिस्त व नियम याविषयीची माहिती प्रा.डॉ. जितेंद्र जळकुटे यांनी करुन दिली. त्याचबरोबर डीएड अभ्यासक्रमाविषयीची माहिती प्रा. ए.एस. धुमाळ यांनी करुन दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अमोल ताकभाते यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील मुलांचे स्वागत केले, त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थ्यांना डीएडमध्ये असणारा स्कोप याविषयीची माहिती सांगितली. डीएडमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा व आदर्श शिक्षक घडवण्यासाठीचे सर्व संस्कार येथे केले जातात, हे देखील सांगितले. त्यांनी आपल्या मनोगतात वेळ , संगत आणि शिस्त याविषयीचे महत्व मुलांना सांगितले. त्यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी कसे होता येईल याचा मूलमंत्र सांगितला. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी डीएडमध्ये केले जाणारे संस्कार तसेच डीएड केलेला विद्यार्थी हा निश्चितपणे अधिकारी होतो किंवा एक उत्तम शिक्षक होतो याची काही उदाहरणे त्यांनी दिली. जिल्हाधिकारी रमेश घोलप, तहसीलदार धीरज मांजरे, अमोल ताकभाते यांच्यासारखे विद्यार्थी तसेच उमेश खोसे, भापकर यांच्यासारखे आदर्श शिक्षक हे याच विद्यालयात घडले आहेत, असे देखील सांगितले. त्यांच्यापासून आपणही प्रेरणा घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले. शेवटी आभार कुमारी धनश्री मोहिते यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन कु.नूतन साळुंखे व कु. सिद्धी डोईफोडे यांनी केले.