मोडनिंब – (ता.माढा) येथे श्री क्षेत्र नारायणगड व श्रीक्षेत्र भगवानगड या दोन्ही पायी दिंडी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. शहरात पालखीचे आगमन होताच अश्व राजाचे स्वागत करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.श्रीक्षेत्र नारायणगड पालखी मोडनिंब येथे मुक्कामास असते. या सोहळ्यास १०० वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा आहे. यावेळी सरपंच लक्ष्मी पाटील, कैलास तोडकरी, कुरण गिड्डे, ग्रा.प. सदस्य बालाजी पाटील, दत्तात्रय सुर्वे, मनसेचे प्रशांत गिड्डे, वैभव मोरे,राहुल पाटील, विजयकुमार नामदे,राहुल गांधी आदी उपस्थित होते.पालखी ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.नारायणगड येथून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची आस ठेवत वारकरी पायी दिंडी सोहळ्यात पालखीबरोबर चालत येतात. मुखी राम कृष्ण हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या ब्रह्मनादात शहर प्रदक्षिणा झाली. या शहर प्रदक्षणेची आदर्शनगर, दत्तनगर, जय भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम चौक, शिवशक्ती चौक, श्री वेताळ देवस्थान नजीक सांगता झाली. दिंडीत भगव्या पताका, पारंपरिक टाळकरी, विणेकरी यांनी विठ्ठलनामाचा ठेका धरत पाउंड खेळले.डोईवर तुळशी वृंदावन घेऊन महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.महिलांनी फुगडीचा आनंद घेतला.दिंड्या शहरात आल्यानतर परिसर विठ्ठलाच्या भक्तिमय झाला. शहरातील स्टेशन रोड, स्वामी समर्थ चौक यासह अनेक ठिकानी वारकऱ्यांसाठी अल्पोपहार वाटप करण्यात आला. वर्षानुवर्षाचे परंपरेनुसार घरोघरी वारकऱ्यांची जेवणाची सोय केलेली असते. गावकरी वारकऱ्यांना घरी जेवायला घेऊन जातात.पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.मोडनिंब येथे एक दिवसाचा मुक्काम घेऊन पहाटे पालखीने प्रस्थान करुन विठ्ठल रखुमाईच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर निघाली.आषाढी सोहळ्याला लाडक्या विठुरायाचे दर्शन व्हावे, ही एकच ईच्छा मनात ठेऊन वारकऱ्यांनी धाव घेतली.
हभप महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरास निघालेल्या या दिंडी सोहळ्यात १२,००० वारकरी भक्त पायी विठ्ठल भेटीला पंढरपूरपुरास चालत निघाले आहेत. सर्वत्र विठूनामाचा गजर होत होता. जय जय राम कृष्ण हरी, नारायण नारायण नगद नारायण असे म्हणत वारक-यांनी आनंद व्यक्त केला.

























