पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. ज्ञानोबा,तुकोबांचे पालखी सोहळे चार दिवसात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असुन लाखो वारकरी आणि भाविकांची पंढरपुरकडे येण्याची आस लागली असताना मात्र, या पार्श्वभूमीवर पवित्र चंद्रभागा नदीपात्राची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून नदीपात्रात घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, दूषित पाणी आणि वाळवंटातील अतिक्रमण यामुळे भाविकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य शासनाकडून आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी आणि पंढरपूर शहराच्या विकासासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र असे असतानाही चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंटाची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
सध्या नदीपात्र आणि वाळवंट परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली असून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर आणि घाटांवर विविध प्रकारची अतिक्रमणे वाढल्याचे चित्र दिसत आहे. घाटांची दुरवस्था, तुटलेले पायऱ्या, अपुरी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला भाविकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित चेंजिंग रूमची सुविधा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, चंद्रभागा नदीपात्रात दूषित पाणी साचल्याने अनेक भाविक धार्मिक परंपरेनुसार त्याच पाण्यात स्नान करताना दिसून येत आहेत. मात्र, दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यभरातून येणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी आषाढी यात्रेपूर्वी चंद्रभागा नदीपात्र, घाट आणि वाळवंट परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, घाट आणि वाळवंटातील अतिक्रमणे हटवावीत, कचरा साफ करून आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
———————-
कोट
आषाढी यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता, घाटांची दुरुस्ती, दूषित पाण्याचा प्रश्न आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
आण्णा सोनटक्के (भाविक,धाराशिव)
———————-
कोट
लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या पंढरपूरची प्रतिमा जपण्यासाठी तसेच माता चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नमामी चंद्रभागा योजनेचे कागदोपत्री नियोजन न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन कृती साधावी.
निर्मला जाधव (महिला भाविक, अहिल्यानगर )
———————
कोट
आषाढी यात्रा तोंडावर आली असताना चंद्रभागा वाळवंटात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आषाढी यात्रेपूर्वी चंद्रभागा नदी पात्र स्वच्छ करून चंद्रभागेत भाविकांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी सोडण्यात यावे.
ज्ञानोबा मोकाशी (भाविक, पुणे )
Post Views: 23