सोलापूर : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागामार्फत राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांमध्येही राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याबाबत महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी कार्यालयीन परिपत्रक काढून सर्व खातेप्रमुख, आस्थापना लिपिक आणि नगर सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक विभागाने आपल्या आस्थापनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी तयार करून १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हुतात्मा स्मृतीमंदिर येथून आवश्यकतेनुसार राष्ट्रध्वज प्राप्त करून घ्यावेत. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना ध्वजांचे त्वरित वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नगरसेवकांसाठीही मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नगर सचिवांनी हुतात्मा स्मृतीमंदिर येथून एकूण १० हजार राष्ट्रध्वज प्राप्त करून घ्यावेत. महापालिकेतील सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना प्रत्येकी १०० राष्ट्रध्वजांचे वाटप करण्याची जबाबदारी नगर सचिवांवर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि भारतीय ध्वजसंहितेचे पालन करण्यावर महापालिका प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नसल्याची
दक्षता घेण्याच्या सूचना
सर्व खातेप्रमुखांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज फडकविण्याची योग्य पद्धत तसेच ध्वजसंहितेतील नियमांची माहिती द्यावी. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी स्पष्ट केले आहे.
—-
Post Views: 12