सोलापूर – माढा तालुक्यातील परिते गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी शासकीय निधीतून २०११ मध्ये खोदण्यात आलेली विहीर सध्या जागेवरच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विहिरीच्या खोलीकरणासाठीही शासनाचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, आता ही विहीर नेमकी कुठे गेली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परिते हे बेंबळे जिल्हा परिषद गटातील गाव असून, गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी या विहिरीवर मोठा शासकीय खर्च करण्यात आला होता. मात्र, सध्या विहीर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी माढा तहसीलदार तसेच कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ तक्रारींची नोंद न करता या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी पुढे आली आहे.
जिल्हा परिषद सदस्य सविता संजय कोकाटे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांना पत्र देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शासकीय निधीतून उभारलेल्या पाणीपुरवठा योजनेतील विहीर गायब होण्यामागे नेमका प्रकार काय आहे, याचा तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
शासकीय निधीचा हिशेब आणि गावाच्या पाण्याचा प्रश्न दोन्ही महत्त्वाचे असून, विहीर गायब होण्याच्या प्रकाराची तातडीने चौकशी करून परितेचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी भूमिका कोकाटे यांनी मांडली आहे.
Post Views: 13