बार्शी – बार्शी शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. शिवाजी कॉलेजसमोरील दोन पानटपऱ्यांवर तपासणी करून एकूण ५,७८६ किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच पुढील विक्रीला आळा घालण्यासाठी दोन्ही पानटपऱ्या सील करण्यात आल्या आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी व अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका रमेश पाटील यांच्या पथकाने गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. पहिली कारवाई दुपारी सुमारे १.३० वाजता शिवाजी कॉलेजसमोरील विश्वराज पान शॉप येथे करण्यात आली. या ठिकाणी तपासणीदरम्यान ५,०३६ रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. पानटपरीचे मालक दिलीप भिमराव जगदाळे यांच्याकडे प्रतिबंधित मालाची खरेदी बिले तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक परवाना अथवा नोंदणी उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले.
यानंतर दुपारी सुमारे १.४५ वाजता शिवाजी कॉलेजसमोरील विनानावाच्या पिवळ्या पानटपरीवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी २३ पुड्या आरएमडी पानमसाला आणि १४ पुड्या ॲक्टर पानमसाला, असा एकूण ७५० रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. पानटपरी चालक साजिद अहमद रफिक विजापूरे यांच्याकडेही खरेदी बिले व आवश्यक अन्न परवाना/नोंदणी नसल्याचे आढळले.
दोन्ही कारवायांमध्ये पंचांसमक्ष प्रतिबंधित अन्नपदार्थांची मोजणी करून नमुने घेण्यात आले असून, उर्वरित साठा पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. संबंधितांनी प्रतिबंधित माल विविध पुरवठादारांकडून घेतल्याचे सांगितल्याने या पुरवठा साखळीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या १३ जुलै २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार १६ जुलै २०२६ पासून राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री व वाहतूक यावर बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यासह भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमांनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही कारवाईत दिलीप जगदाळे, आजम तांबोळी, साजिद अहमद रफिक विजापूरे, आबा पांढरे, मुलगे (पूर्ण नाव माहित नाही), जाकीर चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 13