सोलापूर – आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाने यंदा तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. या निधीतून निवारा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, फिरते शौचालय, महिला स्नानगृहे, जर्मन हँगर, मोबाईल चार्जिंग केंद्रांसह विविध मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाची वारी केवळ धार्मिक सोहळा न राहता सुयोग्य नियोजनाचा आदर्श ठरत असल्याचे चित्र आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या २४ तासांत दर्शन रांगेतून १८ लाखांहून अधिक भाविकांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर वारीत ३० लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वारीत येणाऱ्या भाविकांना केवळ दर्शनच नव्हे, तर सुरक्षित मुक्काम, स्वच्छ परिसर, शुद्ध पिण्याचे पाणी, तातडीची आरोग्य सेवा आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने विशेष नियोजन केले आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत झाली असून, भविष्यात मोठ्या धार्मिक यात्रांच्या व्यवस्थापनासाठी हा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे.
चौकट
सोलापूर जिल्ह्यासाठी ६१.५० कोटींची तरतूद
वारी व्यवस्थापनासाठी सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत ६१.५० कोटी रुपयांचा निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रासाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छता मोहीम, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषध खरेदी, महिला स्नानगृहे, फिरते शौचालय, मोबाईल चार्जिंग केंद्र तसेच ग्रामपंचायतींना विशेष अनुदानाचा समावेश आहे. याशिवाय प्रचार व जनजागृतीसाठी एलईडी स्क्रीन, माहितीपत्रके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला. वारकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहितीही या माध्यमातून देण्यात आली.
कोट
वारी सांस्कृतिक परंपरेचा आत्मा
“वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आत्मा आहे. लाखो भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले असून भाविक-केंद्रित व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले आहे,” असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
चौकट
वारीसाठी निधीचा वापर
बाब
रक्कम
जर्मन हँगर (मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र)
₹८.०० कोटी
वॉटरप्रूफ मंडप
₹३.५० कोटी
प्रचार व प्रसिद्धी
₹५.०० कोटी
वारकऱ्यांना सेवा व सुविधा
₹४.०० कोटी
पाणी टँकर पुरवठा
₹३.०० कोटी
औषधे खरेदी व वैद्यकीय सुविधा
₹१०.०० कोटी
महिला स्नानगृहे
₹१.५० कोटी
फिरते शौचालय
₹२०.०० कोटी
सफाई सेवा
₹१.०० कोटी
मोबाईल चार्जिंग व्हॅन
₹५० लाख
मेडिसिन ऑन व्हील
₹५० लाख
ग्रामपंचायतींना अनुदान
₹४.५० कोटी
सोलापूर जिल्हा परिषदेकडून एकूण
₹६१.५० कोटी
एकूण राज्यस्तरीय खर्च : ₹१५० कोटी