धाराशिव : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अद्ययावत प्रवेशक्षमता यादीत महाविद्यालयासाठी एमडी आणि एमएस अभ्यासक्रमांच्या एकूण ७७ पदव्युत्तर जागांचा समावेश करण्यात आला आहे. विविध १८ वैद्यकीय विषयांमध्ये या जागा उपलब्ध होणार असून, धाराशिवच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी ही महत्त्वपूर्ण घडामोड असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्डाने (MARB) ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत पदव्युत्तर प्रवेशक्षमता यादीत उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावासमोर या जागांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एमडी अभ्यासक्रमाच्या ५४, तर एमएस अभ्यासक्रमाच्या २३ जागांचा समावेश आहे. या निर्णयामुळे धाराशिवसह मराठवाड्यातील वैद्यकीय पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी स्थानिक पातळीवर मोठी संधी उपलब्ध होणार आहे. उच्च शिक्षणासाठी इतर शहरांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच विविध वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञ डॉक्टरांची निर्मिती होऊन भविष्यात जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमांसाठीची अंतिम परवानगीपत्रे (LoP-cum-LoD) आवश्यक इलेक्ट्रॉनिक बँक हमी सादर करून तिची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्पष्ट केले आहे. आगामी समुपदेशन आणि प्रवेशप्रक्रियेसाठी आयोगाची अद्ययावत प्रवेशक्षमता यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
आता धाराशिवमध्ये खालील विषयात पदव्युत्तर शिक्षण
एमडी अभ्यासक्रमांतर्गत भूलशास्त्राच्या ७, शरीररचनाशास्त्राच्या ४, जैवरसायनशास्त्राच्या ५, कम्युनिटी मेडिसिनच्या ४, त्वचारोगशास्त्राच्या २, न्यायवैद्यकशास्त्राच्या ५, जनरल मेडिसिनच्या ५, बालरोगशास्त्राच्या ४, पॅथॉलॉजीच्या ३, फार्माकोलॉजीच्या ७, फिजिओलॉजीच्या ४, मानसोपचारशास्त्राच्या २ आणि रेडिओडायग्नोसिसच्या २ जागा आहेत. एमएस अभ्यासक्रमांतर्गत जनरल सर्जरीच्या ७, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्राच्या ४, नेत्ररोगशास्त्राच्या ४, अस्थिरोगशास्त्राच्या ४ आणि कान-नाक-घसा (ईएनटी) या विषयाच्या ४ जागांचा समावेश आहे.
Views: 12