जेऊर – उजनी धरण भीमानगर येथे प्रस्तावित AI डेटा सेंटर, अणुऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्प स्थानिकांवर जबरदस्तीने लादू नयेत. या प्रकल्पांमुळे शेतकरी, मच्छीमार, रहिवासी तसेच लघुउद्योगांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची भीती असून, सरकारने हे प्रकल्प तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केली आहे. अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांसाठी वरदान ठरले आहे. या धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती आणि मासेमारी व्यवसाय अवलंबून आहे. मात्र, भीमानगर येथे सुमारे १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचे प्रस्तावित प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
यामध्ये हायपरस्केल AI डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, लघु अणुऊर्जा (SMR) प्रकल्प, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे ध्वनी व पर्यावरण प्रदूषणासह पशुपक्षी, जलचर, झाडे, पिके आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा वाघमारे यांनी केला.
उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकरी व मच्छीमारांच्या हिताचा विचार न करता प्रकल्प लादल्यास स्थानिकांच्या रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शासनाने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रस्तावित प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर उजनी धरण संघर्ष समितीचे अविनाश सरडे, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूर भाई शेख, ईन्नुस शेख, किसान मोर्चाचे अध्यक्ष महेश चांदणे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कुदळे, चंद्रकांत साळवे, परवेझ पठाण, शिवाजी शिंदे, हनुमंत चांदणे, दादा आरणे, नितीन आरणे, अशोक दामोदरे, मनीषा दामोदरे, संतोष माने, राम खराडे, जयकुमार कांबळे, गुणवंत ठोसर, प्रशांत उघडे, रामा पांडव, कपिल देडगे, संतोष चव्हाण, नंदकुमार कांबळे, जावेद मनेरी, शहाजी डुकरे, संभाजी शिंदे आदींच्या सह्या आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Views: 9