सोलापूर – जिल्हा परिषदेच्या विविध योजनांअंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांनी सुचवलेल्या विकासकामांना निधी न मिळाल्याने जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आठ दिवसांच्या आत निधी मंजूर न झाल्यास जिल्हा परिषदेला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध गावांतील विकासकामांसाठी खासदार शिंदे यांनी वर्षभरात वारंवार पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद तसेच शासनाकडून निधी मंजूर झालेला नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यामुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेतली. निधीविषयी जाब विचारत निवेदन सादर करण्यात आले. यावर चौकशी करून दोन दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन जंगम यांनी दिले.
यावेळी बोलताना शटगार यांनी निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप केला. विकासकामांसाठीचा निधी सर्वांना समान मिळाला पाहिजे, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक देवकते, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, बंटी चंदनशिवे, पद्मिनी शेट्टीआर, शिल्पा चांदणे, अॅड. महादेव कांबळे, उत्तमकुमार वाघमारे, रोहिणी गायकवाड, शंकर गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















