भारतीय सैन्य लवकरच 400 नवीन हॉवित्झर तोफा खरेदी करणार आहे. या खरेदीसाठी 6500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी सैन्याने संरक्षण मंत्रालयाकडे खरेदीचा प्रस्ताव पाठवला आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या या तोफा पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार केंद्र सरकार लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहे, ज्यामध्ये हॉवित्झर तोफा खरेदी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. “हॉवित्झर ही एडव्हान्सड टोड आर्टिलरी गन सिस्टीम” (एटीएजीएस) तोफ आहे. या तोफेची कॅलिबर 155-एमएम आहे. म्हणजेच या आधुनिक तोफातून 155-एमएम शेल डागता येतील. एटीएजीएसला हॉवित्झर देखील म्हणतात. हॉवित्झर म्हणजे लहान तोफा. किंबहुना दुसऱ्या महायुद्धात आणि त्यापुढील काळात युद्धात खूप मोठ्या आणि जड तोफांचा वापर करण्यात आला. त्यांना लांब अंतरावर नेण्यात आणि उंचावर तैनात करण्यात अनेक अडचणी आल्या. अशा स्थितीत हलक्या आणि छोट्या तोफा बनवल्या गेल्या, ज्यांना हॉवित्झर असे म्हणतात.
ही तोफ पुण्यातील डीआरडीओच्या लॅब एआरडीई, भारत फोर्ज लिमिटेड, महिंद्रा डिफेन्स नेव्हल सिस्टीम, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने विकसित केली आहे. त्याचे विकास काम 2013 मध्ये सुरू झाले आणि पहिली यशस्वी चाचणी 14 जुलै 2016 रोजी घेण्यात आली. या तोफेचा वापर आणि वैशिष्ट्ये बोफोर्स तोफेशी मिळतीजुळती आहेत. ही तोफ जुन्या तोफांपेक्षा खूपच हलकी आहे. या तोफातून डागलेल्या शेलची रेंज 48 किलोमीटर आहे, तर बोफोर्स तोफ 32 किलोमीटर अंतरापर्यंत गोळीबार करू शकते. हे 155 एमएम श्रेणीतील जगातील सर्वात लांब अंतरापर्यंत शेल फायर करण्यास सक्षम आहे. ही तोफ -30 अंश सेल्सिअस ते 75 अंश सेल्सिअस तापमानात अचूक गोळीबार करू शकते. या तोफेच्या 26.44 फूट लांब बॅरलमधून दर मिनिटाला 5 शेल डागता येतात. यात ऑटोमॅटिक रायफलसारखी सेल्फ लोडिंग सिस्टिमही आहे. या तोफेला लक्ष्य करण्यासाठी थर्मल साईट सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही अचूक लक्ष्य ठेवता येते. याशिवाय वायरलेस कम्युनिकेशन सिस्टिमही त्यात आहे.






















