माढा : शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि साखर कारखान्यांनी ऊसाला ५५०० रुपये दर जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, माढा येथे सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन राहिलेले नाही. अशा स्थितीत शासनाने कर्जमाफी जाहीर करूनही केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अनेकांची नावे यादीत असूनही खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे बँकांकडून तगादा लावला जात असून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांनाही अद्याप लाभ मिळालेला नाही.
त्याचबरोबर दुष्काळामुळे जनावरांचे चाऱ्याविना व पाण्याविना प्रचंड हाल होत असून प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
दुसरीकडे, तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करूनही अद्याप कोणताही ऊस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता कारखानदारांची बैठक घेऊन ५५०० रुपये प्रमाणे दर तात्काळ जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.