ऐन उन्हाळ्यात उजनी ते सोलापूर या जुन्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह चिंचोली एमआयडीसीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. गळती थांबविण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे.
सोलापूरची तहान भागविण्यासाठी १९९८ मध्ये सोलापूर ते उजनी जलवाहिनी टाकण्यात आली. जुनाट झालेल्या जलवाहिनीला लागलेली गळती पुन्हा वारंवार थांबवावी लागली. आतापर्यंत जुनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अंदाजे तीन ते साडेतीन कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही दुरुस्ती सुरूच आहे.वडवळजवळील कोळेगाव फाटा परिसरातील वर्धमान, बाळे पुलाखाली, उजनीजवळ भीमानगर, वरवडे फाटा व उजनी हेडवर्क (पंपहाऊसजवळ) या पाच ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे.
त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने एक दिवस पाणी उपसा बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या उजनीवरून येणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असून त्यामुळे चिंचोली एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद राहील.आपल्या आवश्यकतेनुसार पाणीसाठा करून घ्यावा, दुरुस्तीनंतर कमी दाबाने व नंतर सुरळीत पाणीपुरवठा होईल, गैरसोयीबद्दल दिलगिरी असा मेसेज महापालिकेकडून सर्वांना देण्यात आला आहे.