पंढरपूर – कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी पस्तीसहून अधिक प्रकारच्या देशी व विदेशी फुलांचा तसेच विविध प्रकारच्या शोभिवंत पानांचा वापर करण्यात आला असून, सुमारे ५ टन फुलांमधून मंदिर परिसराला आकर्षक आणि मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या पुष्पसजावटीमध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, लक्ष्मी कमळ, मोगरा, जाई, जुई, चाफा, तगर, कागडा, लिली, कन्हेर, निशिगंधा, लिलीयम, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, ब्लू डेझी, जरबेरा, ग्लॅडिओलस, पिंक डेझी, गुलटप्पा, जास्वंद आदी विविध रंगांच्या फुलांचा समावेश आहे. तसेच तुळस, कामिनी, अशोकाची पाने, विड्याची पाने, केळीचे खांब, जिप्सो, मनीप्लांट, ड्रॅसिना, टेबल पाम, सॉन्ग ऑफ इंडिया आदी शोभिवंत वनस्पती व पानांचाही सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.
मंदिरातील संत नामदेव पायरी, महाद्वार, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी, चौखांबी, श्री रुक्मिणीमाता सभामंडप, व्हीआयपी गेट तसेच पश्चिम द्वार या प्रमुख ठिकाणी ही पुष्पसजावट साकारण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांची आकर्षक मांडणी, पारंपरिक व कलात्मक सजावटीचा संगम यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही पुष्पसजावट विशेष आकर्षण ठरत आहे.
ही संपूर्ण पुष्पसजावट सेवा पुणे येथील राम जांभुळकर यांच्यामार्फत करण्यात आली असल्याबाबतची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.