वाळूज महानगर (प्रतिनिधी) : एक वर्षापूर्वी सिमेंस वर्कर्स युनियनच्यावतीने भांगती माता गडावर ६० झाडे लावली होती, त्या झाडांचे संगोपन करत, खत, पाणी घालून वाढवून १५ ऑगस्ट रोजी पर्यावरणाला पूरक असा अनोखा केक बनवून त्या केकचा प्रसाद झाडांना देऊन पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.
झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र घेऊन गावा-गावात झाडे लावण्याचा सपाटा सुरू आहे, त्यासाठी शासन मोफत झाडांची रोपटे पुरवित आहेत, झाडे लावतांना १० जण फोटो काढून वर्तमानपत्रात प्रसिद्धी करून आणतात, नंतर मात्र त्या झाडांकडे दुर्लक्ष केल्या जाते. या सर्व प्रकाराला फाटा देत सिमेंस वर्कर्स युनियनच्यावतीने भांगती माता गडावर ६० झाडे लावण्यात आली, त्याचे संगोपन करून एक वर्ष निगा राखून काल १५ ऑगस्ट रोजी भांगशी माता गडावर झाडांचा वाढदिवस गांढूळखत व शेणखतापासून अनोखा केक बनवून साजरा करण्यात आला.
सीमेन्स वर्कर्स युनियन च्या संकल्पनेने गिर गायीच्या शेणखत व गांडूळ खतापासून केक बनवून तो केक श्री श्री १००८ स्वामी परमानंद गिरीजी महाराज व श्री स्वामी ब्रम्हानंद महाराज याच्या हस्ते केक कापून त्या केकचे सर्व झाडांना खाद्य देण्यात आले. या वेळी टेकडी पर्यावरण ग्रुप, छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक, सह्याद्री वृक्ष बँक ,सामाजिक विचार मंच व अनेक पर्यावरण प्रेमींनी वाढदिवसात सहभाग नोंदवला होता. अशा प्रकारचा उपक्रम करून झाडांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्याचा संकल्प सिमेंस वर्कर्स युनियन यांनी केला.