सोलापूर : कार्यालयाची स्वच्छता केली नाही. कार्यालयात फाईली (अभिलेखे) अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले आहे. ही बाब कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचणारी आहे. त्यामुळे या गैरवर्तनासाठी विविध विभागातील अधिकारी , कर्मचारी यांना प्रत्येकी ५०० रुपये आर्थिक दंड करण्यात आला आहे. तसे आदेश महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे नियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहेत. उपायुक्त लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास आल्याने ही कारवाई केली.
महाराष्ट्र शासनाने सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय प्रसारित केले आहे. त्याअनुषंगाने अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मुल्यांकन करण्याकरीता गुणांकनाबाबत १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम दि.६ मे २०२५ ते दि.२ ऑक्टोंबर २०२५ अखेर राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत शासन निर्णयाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कार्यालयातील स्वच्छता व अभिलेखे वर्गीकरण करण्याबाबत आदेश दिले होते.
दरम्यान, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी महापालिकेतील विविध कार्यालयास भेट दिली असता अभिलेखे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले आहे. तसेच कार्यालयाची स्वच्छता केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचणारी आहे. त्यामुळे गैरवर्तनासाठी विविध विभागातील अधिकारी , कर्मचारी यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) (ड) च्या तरतुदीनुसार प्रत्येकी ५०० रुपये आर्थिक दंड करण्यात येत आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांना केलेल्या दंडाची रक्कम ऑक्टोबर २०२५ पेड इन नोव्हेंबर २०२५ च्या मासिक वेतनातून एक रक्कमी वसूल करावी, असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी आदेशात म्हटले आहे.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झाली दंडात्मक कारवाई
मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक उमेशकुमार वाघमारे, यल्लप्पा कुंभार, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विशाल भोये , वरिष्ठ मुख्य लेखनिक मुर्तुज शहापुरे , शिपाई विजयकुमार माने, भाग्यरथी कोळी, नगरचना विभागातील कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध गदगे , आनंद जोशी, शिपाई तुकाराम कांबळे, ट्रेसर सुवर्णा पुफाळ , आरोग्य खात्यातील वरिष्ठ मुख्य लेखनिक राजू शिवशिंपी , कनिष्ठ श्रेणी लिपिक सागर चव्हाण, सुरेश पोटे , रखवालदार अरब फरीदसाब, युसीडी विभागातील तांत्रिक तज्ञ एस. ए. मुलाणी, गणेश यु. एस., समूह संघटक एस. एस. जलदुर्ग, ए. डी. जाधव, पी.एस. इंगळे , व्ही. बी. शेख, एस. ए. वडावराव, एस.टी. वाघमारे, जी.ए. हजारे , एस. एम. पोळ, एस. एम. वाघमारे , एम
एस. शिरसागर, एस. एस. गायकवाड, ए. एस. महाले, समाज विकास अधिकारी अजितकुमार खानसोळे, कार्यालय अधीक्षक उज्वला डांगे, शिपाई एल. एस. शेटे आधी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

















