पंढरपूर – कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट, पासष्ठ एकर परिसर ,पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास एक हजार ५९८ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे ३५० कायम इतर १०० कर्मचारी तर जवळपास एक हजार ६८ हंगामी कर्मचारी व ८० सुपरवायझर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक, जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत ३० पथके स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.
प्रशासनामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या बरोबरच वाळवंट परिसरात १५ ठिकाणी चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. नदी पात्र, वाळवंट परिसर, पासष्ठ एकर येथे हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले असून, कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यात आले आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे.
भक्तीसागर, पत्राशेड, वाळवंट या ठिकाणी मोफत ६ लाख पाणी बॉटल व ३ लाख ज्युस बॉटल वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.शहरातील सुरक्षेसाठी १४३ सीसीटीव्ही, शहरातील मुख्य रस्त्यावर विद्युत रोषणाई, शहरातील १७ ठिकाणी वाहनतळ व्यवस्थेचे स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
शहरासह पासष्ठ एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह ,मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे.घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या ,कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी, जेटींग, सक्शन मशीन आदी वाहनांच्या माध्यमातून स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील.
पत्राशेड, वाळवंट, पासष्ठ एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी पाण्याच्या टिपा ठेऊन त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून ९ प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. तसेच नदीपात्रात व घाटावर अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नदीपात्रात हायमास्ट पॉइंट्स, घाटांवर एलईडी दिवे चालू करण्यात आले आहेत.
यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांनी शौचालयाचा वापर करावा, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावेळी केले आहे.
ठळक मुद्दे – *स्वच्छतेसाठी १ हजार ५९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती * तात्पुरती १ हजार २०० व कायमस्वरूपी ४ हजार ३९७ शौचालय * स्वच्छतेसाठी नवी मुंबई महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिकेचे पथके * मोफत ६ लाख पाणी व ३ लाख ज्युस बॉटल वाटपाचे नियोजन * शहर सुरक्षेसाठी १४५ सीसीटीव्ही* मुख्य रस्त्यांवर विद्युत रोषणाई*


















