सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती अशा गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या लकी चौकातील बस स्टॉप मध्ये मोठे भगदाड पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेने दखल घेतली. या बस स्टॉपमधील ते भगदाड बुजविण्यात आले आहे. महापालिकेने कार्यवाही केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सोलापूर शहरातील नवी पेठ लगत असलेल्या सुभाष चौक (लकी चौक) येथे सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे बस स्टॉप अनेक वर्षापासून आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेले हे बस स्टॉप प्रसिद्ध आहे. नेहमी या ठिकाणी मोठी गजबज असते. मात्र या बस स्टॉपच्या खालच्या बाजूला खंदक बागेकडे मोठे भगदाड पडले होते. यामुळे या बस स्टॉप मध्ये थांबणे धोकादायक झाले होते. गेल्या अनेक दिवसापासून याकडे महापालिका परिवहन उपक्रम प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तातडीने दखल घेतली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी याबाबत कार्यवाही केली. संबंधित विभागाकडून या बस स्टॉपमधील ते पडलेले भगदाड बुजविण्यात आले आहे. बस स्टॉप परिसरातील स्वच्छताही करण्यात आली. महापालिका प्रशासनाने कार्यवाही केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे या बस स्टॉपच्या समोरच दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्किंग केली जातात. यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बस स्टॉपची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. महापालिका परिवहन उपक्रम सुधारत असतानाच बस स्टॉपकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज वर्तवली जात आहे.





















