बार्शी – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेली बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर काल दि. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली असून दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर ७ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निबंधक सहकारी संस्था किरण गायकवाड व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
सप्टेंबर महिन्यात बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासनाने अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. बाजार समिती निवडणूकीसाठी ए.ए. गावंडे हे काम पाहणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात ७ डिसेंबर रोजी मतदान तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. संचालक मंडळाची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली होती. मात्र तीन वेळा मुदत वाढ व नंतर प्रशासकीय मंडळ बाजार समितीचा कारभार पाहत आहे. सहकारी संस्था ११ जागा, ग्रामपंचायत गटाच्या ४ जागा, व्यापारी-अडते २ जागा व हमाल तोलार १ जागा या चार मतदारसंघात १८ संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी दि.३ ते ७ नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जाची छाननी १० नोव्हेंबर रोजी होणार असून ११ नोव्हेंबर रोजी
उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ११ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दि.२६ नोव्हेंबर रोजी उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप केल्यानंतर ७ डिसेंबर रोजी मतदान होईल तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याचे किरण गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या या निवडणूक कार्यक्रमात म्हटले आहे.























