बार्शी – बार्शीचे महावीर कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या चिकाटीचा आणि सहनशक्तीचा परिचय देत जगातील सर्वात कठीण मानली जाणारी आयरनमॅन (IRONMAN) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
१ नोव्हेंबर २०२५ रोजी मलेशियातील निसर्गरम्य लंगकावी बेटावर (Langkawi Island) ही आंतरराष्ट्रीय आयरनमॅन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महावीर कदम यांनी तब्बल २२६ किलोमीटर अंतर पूर्ण करत ‘फुल आयरनमॅन’ ही क्रीडापदवी मिळवली.
स्पर्धेअंतर्गत त्यांनी ३.८ किलोमीटर समुद्रात पोहणे (Pantai Kok Beach), १८० किलोमीटर डोंगराळ आणि निसर्गरम्य मार्गावर सायकलिंग, ४२.२ किलोमीटर दमदार रनिंग असे तीन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले. या सर्व प्रवासासाठी त्यांनी एकूण १६ तास २८ मिनिटांचा कालावधी घेतला.
लंगकावीचे उष्ण आणि दमट हवामान, डोंगराळ रस्ते आणि दीर्घ अंतर या सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी दाखवलेली जिद्द आणि तयारी कौतुकास्पद आहे. ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे केवळ शारीरिक ताकदीचं नव्हे, तर मानसिक धैर्य आणि चिकाटीचंही प्रतीक आहे.
महावीर कदम यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील आयरनमॅन स्पर्धाही यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. त्यामुळे आता त्यांनी दोन देशांतील ‘आयरनमॅन ’ पदवी आपल्या नावावर केली आहे.

















