सोलापूर : महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये अद्यावत सोयी सुविधा मिळत आहेत. मागील तीन महिन्यात सोलापूर महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये प्रसूतीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते. महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला जात आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सर्व प्रसूतीगृहांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम व विश्वासार्ह बनल्याने नागरिकांचा कल पुन्हा महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांकडे वाढताना दिसत आहे.
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सोलापूर शहरातील श्रेयस नर्सिंग होम सील करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेच्या आशा वर्कर्स यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये गर्भवतींना दाखल करून घेत आहेत. त्यामुळे मनपाच्या प्रसूतीगृहांमधील रुग्णसंख्या व प्रसूतींची संख्या दोन्हीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे.
माहे ऑगस्ट 2025 मध्ये आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी श्रेयस नर्सिंग होम सील केले होते. ऑगस्ट 2025 मध्ये महापालिकेच्या सर्व प्रसूती ग्रहांमध्ये 236 प्रसूती झाल्या होत्या. दरम्यान, जुलै 2025 मध्ये मनपा प्रसूतीगृहांमध्ये 182 इतक्या प्रसूती झाल्या होत्या.
सोलापूर शहरातील महापालिकेचे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह , दाराशा प्रसूतीगृह
अद्यावत करण्यात आले. या दोन्ही प्रसूतीगृहांमध्ये
नॉर्मल आणि सिझरियन प्रसूती केल्या जातात. महापालिकेच्या इतरही सर्व प्रसूतीगृहांमध्ये
चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. सोलापूर महापालिकेच्या भावना ऋषी प्रसूतीगृह,
जिजामाता प्रसूतीगृह, चाकोते प्रसतीगृह, रामवाडी प्रसूतीगृह यासह इतर प्रसूतीगृहामध्ये गर्भवती रुग्णांची संख्या वाढली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे.
विशेष म्हणजे महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये सोयी सुविधांबरोबरच सर्व परिसरात स्वच्छता आहे. सर्व प्रसूतीगृहांमध्ये स्वच्छता, आवश्यक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, तसेच २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.अद्ययावत असलेल्या या प्रसूतीगृहांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी केले आहे.
मागील तीन महिन्यात प्रसूतीमध्ये झालेली वाढ अशी
दरम्यान, मागील तीन महिन्यांचा विचार करता ऑगस्ट 2025 मध्ये 236 प्रसूती, सप्टेंबर 2025 मध्ये 254 तर ऑक्टोबर 2025 मध्ये 270 प्रसूती झाल्या आहेत. एकूण आकडेवारी पाहता महापालिकेच्या विविध प्रसूतीगृहांमध्ये प्रसुतीच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. ही वाढती संख्या सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शविते असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी स्पष्ट केले.

















