सोलापूर – सनातन वैदिक हिंदू धर्मातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणानंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीचा मुहूर्त साधून सोलापूर शहरात तुळशी विवाहास मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. सोलापूर शहरवासीयांनी घरोघरी आपल्या तुळशी वृंदावनाची सजावट करून प्रभू श्रीकृष्णाशी तुळशीचे लग्न थाटामाटात लावून दिले. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात अंतरपाट धरून हा लग्न सोहळा यथोचित संपन्न झाला.
दरम्यान, तुळशी विवाह धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी तसेच ऊस अशा विविध प्रासादिक साहित्यांनी सजवून गेल्या होत्या. विजापूर रोडवरील मार्केटमध्ये भाविकांनी सकाळपासूनच प्रासादिक साहित्य तसेच ऊस खरेदी केले. धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी लागणारे हिरव्या बांगड्या, मनी मंगळसूत्र, जोडवे, आरसा, वस्त्रमाळ असे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी बाजारात गर्दी केली होती. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर सायंकाळी मोठ्या धार्मिक आणि प्रसन्नतेच्या वातावरणात भगवंताच्या शाही विवाह सोहळ्याचे मनोहर चित्र सोलापूरवासियांच्या घरोघरी दिसून आले.
भगवान श्रीकृष्ण आणि तुळशी मातेचा विवाह सोहळा कार्तिकी एकादशीनंतर सुरू होतो. पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा मुहूर्त असतो. देवाचा हा शाही विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतरच लग्नसराई सुरू होते. अशी सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये परंपरा आजतागायत कायम आहे.
फोटो ओळ – शहरात तुळशी विवाह मोठ्या उत्सव वातावरणात संपन्न झाले. तर दुसऱ्या छायाचित्रात तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विजापूर रोड परिसरातील बाजारपेठेत अधिक साहित्य खरेदी करताना महिला


















