बार्शी – “महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी समताधिष्ठित समाजनिर्मितीचा प्रेरणादायी विचार दिला. आज समाजात खोलवर रुजलेली जातीय विषमता महात्मा फुलेंच्या विचारांनीच संपू शकते, ” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी व्यक्त केले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे साहित्य नगरी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बार्शी येथे आयोजित २० व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष फुलचंद नागटिळक, स्वागताध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, संमेलनाचे निमंत्रक प्रा.पंडितराव लोहोकरे, जयकुमार शितोळे, अनिल अनभुले, डॉ. हनुमंत चिकने, अमोल कुंभार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष फुलचंद नागटिळक म्हणाले, महात्मा फुलेंचे विचार आज आत्मसात केले पाहिजेत. शेतकऱ्यांना व सामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून त्यांनी केलेले कार्य देशाला दिशादर्शक आहेत.
स्वागताध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव म्हणाले, म.फुले हे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ व मानवमूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी विषमता, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य व सामाजिक अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला. आज फुलेंच्या परिवर्तनवादी विचारांची गरज आहे.”
या कार्यक्रमात शरद पाटील (महात्मा फुले कृषिरत्न जीवनगौरव पुरस्कार), डॉ. प्रभाकर माळी (महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार), गुरु भांगे (महात्मा फुले युवा कृषिरत्न पुरस्कार), हर्षल बागल (महात्मा फुले युवा समाजरत्न पुरस्कार), अमोल कुंभार (महात्मा फुले युवा समाजरत्न पुरस्कार), परमेश्वर पालकर (महात्मा फुले साहित्यरत्न पुरस्कार), रामदास नागटिळक (महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार), सुभाष नागटिळक (विशेष कार्य सन्मान), कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी (उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार) यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात कवी प्रकाश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्रातून ४२ कवींनी कविसंमेलनात सहभाग नोंदवला. या संमेलनाचे सूत्रसंचालन आणि आभार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी केले.
चौकट
“पाणी आडवा, पाणी जिरवा हा म. फुलेंनी दिलेला मूलमंत्र महाराष्ट्र विसरला त्यामुळे आज पाण्याच्या भीषण संकटाचा सामना महाराष्ट्राला करावा लागत आहे. आज त्यांची जलसंधारणाची धोरणे आपण अवलंबली पाहिजेत. स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पाया भारतामध्ये घातला. शिक्षणातून समाजात वैचारिक परिवर्तन आणले. म्हणून २८ नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा.”
— डॉ. शरद गोरे
Views: 13