पंढरपूर – कार्तिक एकादशीच्या पवित्र महापर्वानिमित्त येथील विठ्ठल मंदिरात श्रीपांडुरंग-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर राज्यातील तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर क्षेत्रातील सकल ज्येष्ठ कीर्तनकार, संत साहित्य अभ्यासक आणि संतवंशज यांचा संतपूजन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रद्धापूर्वक पार पडला.
अनेक वर्षे देवाची पूजा केल्यानंतर संतांच्या पूजेचा मानस उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मनी होता. या भावनिक संकल्पनेतून “वारकरी हाच आमचा व्हीआयपी आहे” हा संदेश देत त्यांनी संत परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प. पू. श्रीगुरु श्री चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त करत आशीर्वाद दिले.
या भव्य सोहळ्याचे संयोजन शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना तर्फे करण्यात आले. उमेश महाराज बागडे यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका व संप्रदायाचे एकनाथ शिंदें वरील प्रेम याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक पू. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर, श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर, श्रीगुरुराजमहाराज देगलूरकर, श्रीगुरु श्री प्रमोदमहाराज जगताप यांच्यासह अनेक संतपरिवारातील मान्यवरांशी एकनाथ शिंदे यांनी आत्मीय संवाद साधला. शेकडो वर्षांची संत परंपरा जपणाऱ्या या संतमंडळींशी पारिवारिक वातावरणात हितगुज साधण्यात आले.
संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत गंगूकाका शिरवळकर यांचे वंशज, संत निवृत्तीनाथ संस्थान व संत मुक्ताई संस्थान विश्वस्त, बडवे उत्पात परिवार, वारकरी फडकरी संघटना, वारकरी पाईक संघ, वारकरी संप्रदाय युवा मंच, अखिल वारकरी गुरुकुल संघ, सद्गुरू सेवा समिती आणि संत सेवा संघ यांचे प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित होते
यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार समाधान आवताडे तसेच शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे सचिव श्रीराम महाराज माळी आदींसह पदाधिकारी व संतप्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————–
पूरग्रस्त भागातील गावांना भजन साहित्य भेट –
या प्रसंगी पूरग्रस्त भागातील शंभर गावांना भजन साहित्य पखवाज, टाळ, वीणा व ग्रंथसंपदा भेट स्वरूपात देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.






















