सोलापूर : सोलापूर महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांची पदोन्नतीने बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली झाली आहे. सोलापूर महापालिकेत 20 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विभागाची जबाबदारी सांभाळत चांगले काम केले आहे.
महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी सोलापूर महापालिकेत दि. 28 मार्च 2024 रोजी पदभार घेतला होता. त्यांची आज सोलापूर जिल्ह्यातीलच बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी(अ वर्ग श्रेणी) पदी पदोन्नतीने बदली झाली आहे. शासनाने तसे आज आदेश काढले आहेत. सोलापूर महापालिकेतील विविध विभागाची जबाबदारी त्यांनी नेटक्या पद्धतीने पार पाडली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका परिवहन उपक्रम, शिक्षण विभाग, पर्यावरण, उद्यान विभाग, मुख्य लेखा परीक्षक आदी विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. महापालिका परिवहन विभाग पहात असताना त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना जीपीएफ देण्यासाठी नेटके आर्थिक नियोजन केले होते. या कर्मचाऱ्यांची देणे देण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते. महापालिकेतील पर्यावरण विभाग पहात असताना प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.
सर्वांचे चांगले सहकार्य लाभले : मुलाणी
सोलापूर महापालिकेमध्ये कर्मचारी, अधिकारी तसेच पत्रकार यांच्यासह सोलापूरकरांचेही चांगले सहकार्य लाभले. विविध विभागाची कामे चांगल्या पद्धतीने करता आली. एक चांगला ऋणानुबंध सोलापूरशी निर्माण झाला. यामुळे सोलापुरातील कार्यकाळ हा चिरस्मरणात राहील, अशी भावना उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी व्यक्त केली.


























