सांगोला – सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी एकूण मतदार संख्या ३३ हजार ६९८ असून यामध्ये स्त्री मतदार संख्या १६ हजार ८३८, पुरुष मतदार संख्या १६ हजार ८५८ व इतर २ अशी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली. सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ अनुषंगाने तालुकास्तरीय अधिकारी, राजकीय प्रतिनिधी व पत्रकार बांधव यांची बैठक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नगरपरिषदचे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे उपस्थित होते.
नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भरण्याचा कालावधी दि.१० ते १७ नोव्हेंबर (दु.२ पर्यंत), नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी दि.१० ते १७ नोव्हेंबर (दु.३ पर्यंत) रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्राची छाननी व वैदरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दि.१८ नोव्हेंबर स.११ वाजेपासून, नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि.१९ ते २१ नोव्हेंबर दु.३ वाजेपर्यंत, अपील असल्यास दि.२५ नोव्हेंबर पर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दि.२६ नोव्हेंबर, मतदानाचा दि.२ डिसेंबर स.७.३० पासून ते सायं.५.३० पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दि.३ डिसेंबर स.१० वाजल्यापासून, शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे दि.१० डिसेंबर पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिली. यावेळी निवडणूक विषयक आचारसंहिते बाबत मार्गदर्शन करून लोकसभा, विधानसभा प्रमाणे सांगोला नगरपालिका या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात असे आवाहन सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
एकूण मतदान केंद्र संख्या ४० आहे. तसेच खर्च मर्यादा थेट नगराध्यक्ष यांच्यासाठी ७ लाख ५० हजार तर सदस्य यांच्यासाठी २ लाख ५० हजार इतकी आहे. आचार संहिता कालावधी हा दि.४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असून, जाहीर प्रचार कालावधी हा दि.२७ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. जाहीर प्रचाराची ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, जय भवानी चौक, महात्मा फुले चौक, न्यू इंग्लिश स्कूल मैदान ही आहेत.
– डॉ.सुधीर गवळी, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी

















