सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा दि.८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा दि. १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन आता अधिक वेगाने सुरू होणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षांच्या वेळापत्रकाची माहिती दिली. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी ते गुरुवार, १८ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षांची तयारी पूर्ण करावी लागणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी ते सोमवार, १५ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.
परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या
www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, संकेतस्थळावरील वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत मिळणारे छापील वेळापत्रक अंतिम राहणार आहे.
दरम्यान, सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर प्रसारित होणाऱ्या अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेच्या तयारीला लागावे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.