छत्रपती संभाजीनगर – धम्म, शांती आणि करुणेचा जागतिक संदेश पुन्हा एकदा भिमटेकडीवरून जगभर झळकणार आहे. ७० वर्षांनंतर पुन्हा प्रथमच येथे ‘जागतिक बौद्ध धम्म परिषद’ भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, २६, २७, २८ फेब्रुवारी ते १,२ मार्च २०२६ या पाच दिवसीय कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे.
या परिषदेत २५ देशांमधून, महाराष्ट्रातून भिक्खु व भिक्खुनी संघ दाखल होणार आहेत, तसेच एक लाखांहून अधिक उपासक–उपासिका सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहर जागतिक नकाशावर बौद्धधम्माचे तेज पुन्हा उजळविणार आहे.
कार्यक्रमासाठी २५ एकरांवर विशाल मंडप उभारला जाणार असून, २५ एकरात निवास, भोजनालय, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एकूण ५० एकर अपरिसरात ही धम्मपरिषद संपन्न होणार आहे. गेल्या दहा महिन्यांपासून जय्यत तयारी आणि नियोजन सुरू असून, शेकडो स्वयंसेवक, उपासक-उपासिका आणि सामाजिक कार्यकर्ते श्रमदान व आर्थिक सहकार्य देत आहेत.
या परिषदेला पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, प्राध्यापक, संपादक, पत्रकार, उद्योजक, साहित्यिक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात धम्मतत्त्वांवर आधारित सांस्कृतिक सादरीकरणे, तसेच धम्म शिक्षण, पर्यावरण, धम्मदीक्षा, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक समता यांसारख्या विषयांवर विशेष परिसंवाद होणार आहेत.
जागतिक धम्म परिषदेच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत मुख्य संयोजक पू. भिक्खूनी प्रा. धम्मदर्शना महाथेरी म्हणाल्या की,“ही परिषद कोणाच्याही मालकीची नाही ती संपूर्ण मानवतेची, सर्व बुद्ध अनुयायांची आहे. प्रत्येकाने आर्थिक, श्रमिक आणि लोकसहभागाने या जागतिक धम्मपरिषदेच्या यशासाठी योगदान द्यावे.”
या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही जागतिक ओळख निर्माण करणार आहे, असे पूज्य प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी सांगितले.
भिमटेकडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला आर्याजी संघशिला, अनिकुमार बस्ते, डॉ. धनराज गोंडाने, विजय मगरे, ऍड. रामेश्वर तायडे, रतनकुमार साळवे,अनिता हिवाळे, सोनाली जोहरे, दीपक लव्हाळे, सुनीत दांडगे, भानुदास डोके,अमोल दांडगे, प्रा. सुनील वाकेकर, जोगेंद्र तायडे, अनिकेत ओव्हाळ, डॉ. प्रकाश इंगळे, मीनाताई काकडे, सुधाकर उमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.





















