सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित “प्रिसिजन गप्पा 2025” या बहुचर्चित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी “अपूर्वाई” हा कविता, गाणी आणि बासरीचा त्रिवेणी संगम असणारा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अमेरिकेतून थेट भारतात आणि तेही पहिल्यांदाच सोलापूरमध्ये “अपूर्वाई” सादर झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला “अपूर्वाई” या त्रिकूटाचे — कवी वैभव जोशी, गायिका शरयू दाते आणि बासरीवादक अमर ओक — यांचे प्रिसिजनचे चेअरमन श्री. यतिन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते सन्मान करून स्वागत करण्यात आले.
गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण सभागृह भावगीतांच्या, चित्रपट, कवितांच्या आणि बासरीच्या सुरांनी भारून गेले.
शरयू दाते यांनी “जिवलगा येशील तू परत”, “सखे मी मज हरपून बसले ग” यांसारखी भावस्पर्शी गाणी सादर केली. कवी वैभव जोशी यांनी आपल्या नेहमीच्या थेट आणि हृदयस्पर्शी शैलीत कविता, किस्से आणि संवाद सादर केले –
> “कुठून तरी तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं…”
तसेच,
> “मला काही कमी नव्हती, मला काही कमी नाही, तरीही मला काही कमी आहे याची हमी नाही…”
अशा ओळींनी त्यांनी रसिकांना अंतर्मुख केले.
बासरीवादक अमर ओक यांनी या संपूर्ण संध्याकाळी अनेक भावगीतांवर आपल्या बासरीच्या मधुर सुरांनी मंत्रमुग्ध वातावरण तयार केले. त्यांनी शरयू दाते आणि वैभव जोशी यांच्या सादरीकरणाला बहारदार साथ दिली.
पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही सभागृहात आणि बाहेरही प्रचंड गर्दी उसळली होती. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात “अपूर्वाई”ला भरभरून दाद दिली.
सोलापूरच्या कलारसिकांसाठी ही संध्याकाळ खरोखरच अविस्मरणीय ठरली.
















