सोलापूर : आहाराने शरीर सशक्त होते तर बुध्दी विचाराने सशक्त होते. शरीर बुध्दीच्या नियंत्रणाखाली असल्याने बुध्दीचे सशक्तीकरण आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते. ती गरज ग्रंथातून पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन श्री काशी जग÷द्//गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
वाराणसी-काशी जंगमवाडी मठ संचलित श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान, द्वारा संचलित जोडभावी पेठ येथील पाटील प्लाझा येथील श्री काशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्राचे लोकार्पण श्रीकाशी जग÷द्//गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जग÷द्//गुरू सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी महास्वामी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भी. शि. स्वामी होते.
याप्रसंगी या संस्थेसाठी काशीपीठाला वास्तू दान देणारे उद्योगपती तथा शेळगी श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष जगदीश पाटील, नेपाळ येथील जंगमवाडी मठाचे भरत जंगम, ओंकारसिध्द महास्वामी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य, दहिवडकर महाराज, बिदरचे राजशेखर महास्वामी, मुस्लीम धर्माचे अभ्यासक जावेद शेख, हाजी उस्मान जमादार, प्र.कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा, अमोल चाफळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. अनिल सर्जे यांनी प्रास्ताविकात या अभ्यास केंद्राची रूपरेषा, उद्दिष्ट आणि कार्यपध्दतीविषयी सविस्तर भूमिका मांडली.
श्री काशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्र केवळ वीरशैव लिंगायत नव्हे तर सकल धर्म संप्रदाय आणि सकल भाषेतील जागतिक संत साहित्य संशोधन केंद्र म्हणून लौकिक प्राप्त करेल असा विश्वास संस्थेचे आश्रयदाते हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील यांनी व्यक्त केला. भविष्य काळात संस्थेच्या विस्तारासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाहीही डॉ.पाटील यांनी दिली.
राजेंद्र बलसुरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रेवणसिध्द वाडकर यांनी केले. या प्रसंगी सतीश शेंडे, शांतय्या स्वामी, सिध्दय्या स्वामी, श्रुती वडकबाळकर यांच्यासह संत साहित्याचे अभ्यासक आणि विविध मठाचे महास्वामी उपस्थित होते.
दान हे हाताचे भूषण
दान देत असताना ते सत्पात्री असावे याची काळजी घेणे आवश्यक आहे. दान हे हाताचे भूषण आहे. व्यापक समाजहिताच्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण दिलेले दान आगामी पिढ्यांच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास उज्जैन जगद्गुरू सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केला. संशोधन केंद्राला वास्तु उपलब्ध करून दिल्याबद्दल जगद्गुरूंनी पाटील परिवाराचे कौतुक केले.

















